कराड प्रतिनिधी | कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे प्रसिद्ध बाल चिकित्सा सर्जन डॉ. पारस कोठारी यांच्यासह त्यांच्या 8 जणांच्या टीमकडून हरनिया, अपेंडिक्स आदिंसह जिभेवरील तसेच अंडाशयतील गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या 68 बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेविकांच्यावतीने कराड तालुक्यातून 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांच्यापैकी 68 बालकांना कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात दि. 25 रोजी आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. पारस कोठारी यांच्यासह त्यांच्या टीमने काल आणि आज अशा दोन दिवसात यशस्वी शस्त्रक्रिया केली.
कराड तालुक्यातील दुर्गम अशा भागातील गावात अंगणवाडीतून आरोग्य सेविकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये जी बालके गंभीर स्वरूपाच्या आजारांनी ग्रस्त आढळून आली. त्यांना सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात येते. त्यांची येथील बालरोगतज्ञांच्या मार्फत तपासणी करण्यात येते. अशा प्रकारे त्या बालकांवर उपचार करण्यासाठी मुंबईच्या सायन हॉस्पिटलमधील डॉ. पारस कोठारी यांच्या टीमला कराड येथे दि. 25 रोजी बोलवण्यात आले. या ठिकाणी दाखल झाल्यानंतर डॉ. पारस कोठारी यांच्या टीमने 68 बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली.
मुंबईतील सायन हॉस्पिटलचे बाल चिकित्सक डॉ. पारस कोठारी यांच्यासह डॉ. अदिती दळवी, डॉ. सौरीन दानी, डॉ. प्रतिक्षा जोशी, डॉ. आकृती प्रभु, डॉ. भाग्यश्री भालेराव, स्टाफ स्वाती नारकर व श्रीमती कुमुद खडपे यांच्या टीमने दोन दिवसात अवघड अशा स्वरूपाच्या जिभेला जीभ चिकटलेल्या, हर्नियाच्या, हायड्रोसिल, अंडाशयावरील शस्त्रक्रिया, बेंबीतील शस्त्रक्रिया असा एकूण 68 शस्त्रक्रिया केल्या.
कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पार पडलेल्या शिबीरास उपजिल्हा रुग्णालय कराडचे भुलरोगतज्ञ डॉ. प्रशांत देसाई, डॉ. मोहोळकर, डॉ. साधना क्षीरसागर, डॉ. अमित पाटील, डॉ. आरती माने बालरोगतज्ञ, कार्यक्रम पर्यवेक्षिका श्रीमती असिया पट्टणकुडे, मेट्रन श्रीमती मंगल जानकर, डॉ. भक्ती जाधव आरबीएसके नोडल ऑफीसर, सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सर्व आरबीएसके वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांनी केले. उपजिल्हा रुग्णालयात कराड तालुक्यात असलेल्या शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या 68 बालकांवर शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कराड डॉ. शिला खैरमोडे यांच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आले होते.
बालकांच्या आजारांवर उपचारासाठी आता डॉक्टर आल्या दारी : डॉ. पारस कोठारी
0 ते 18 वयोगटातील बालकांना अनेक गंभीर स्वरूपाचे आजार उध्दभवतात. अशा बालकांना पालकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये अनेक गंभीर अशा स्वरूपाच्या आजारांवर उपचार केले जातात. यावर्षी कराड तालुक्यातील 68 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आल्या आहेत. अनेकदा बालकांना गंभीर आजार उध्दभवल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पैशाअभावी पालकांना मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी जात येत नाही. अशा पालकांसाठी राष्ट्रीय बाळ स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत मोफत उपचार केले जात आहे. त्यासाठी आम्ही सर्व सोयी असलेल्या तालुका पातळीवरील शासकीय रुग्णालयात येऊन शस्त्रक्रिया करत असल्याची माहिती सायन हॉस्पिटलचे बाल चिकित्सक डॉ. पारस कोठारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
कराड उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा लाभ घ्या : डॉ. प्रशांत देसाई
कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलासावरील अवघड शस्त्रक्रिया तसेच ह्रदयविकाराबाबत देखील उपचार केले जातात. या ठिकाणी शासनाच्या अनेक योजनेतून अगदी मोफत उपचार दिले जातात. मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील 68 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. नागरिकांनी शासनाच्या आरोग्याबाबतच्या अनेक योजनांचा या याठिकाणी येऊन लाभ घ्यावा, असे कराड उपजिल्हा रुग्णालयातील भुलरोगतज्ञ डॉ. प्रशांत देसाई यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना म्हंटले.
लहान मुलांच्या उपचारांबाबत शासनाचे अनेक उपक्रम उत्तम : विनोद पवार
कराड तालुक्यातील गावातील 68 बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांच्या पालकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. या ठिकाणी नांदगाव येथील विनोद दशरथ पवार हे देखील आपल्या पाल्यास घेऊन आले होते. त्याच्या देखील पाल्यावर उपचार करण्यात आले. यावेळी त्यांनी शासनाच्या या उपक्रमाबाबत व योजनेबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना समाधान व्यक्त केले.