सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील विविध सरकारी कार्यालयांतील १५ वर्षांचे आयुष्यमान पूर्ण झालेली सुमारे ७०० हून अधिक सरकारी वाहने ३१ डिसेंबरपर्यंत भंगारात काढण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया सुलभ आणि जलदगतीने व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यातील सरकारी कार्यालयामध्ये कालावधी पूर्ण झालेली शासकीय वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. ही शासकीय वाहने दर वर्षी त्यांचे आयुष्यमान संपेल, त्या पद्धतीने भंगारात काढली जातात.
जानेवारी २०२१ मध्ये सरकारी वाहनांसाठी व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी मंजूर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सरकारी वाहने भंगारात घातली जात आहेत. राज्यात मोठ्या संख्येने सरकारी वाहने भंगारात टाकण्यात येतात. त्यासाठी वाहनांची नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. संबंधित सरकारी कार्यालयांनी पोर्टलवर माहिती भरणे बंधनकारक असून, त्यानुसार संबंधित कार्यालयाकडील वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत.