‘उमेद’ने सोडवला ‘फायनान्स’चा विळखा; संकल्प यात्रेत एकाच दिवसात 11 कोटी वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । वंचित घटकांना मुख्य प्रावाहात आणण्याबरोबर मायक्रो फायनान्सच्या विळख्यात अनेक गरीब गरजू कुटुंबे अडकली आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानानने बचत गटाच्या माध्यमातून मोठा आधार देण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षात उमेद परिवारातील २ लाख पेक्षा जास्त कुटुंबांना सातशे आठ कोटी अर्थसहाय्य अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून दिले आहे. आज एका दिवसात विकसित भारत संकल्प यात्रा विशेष मोहिमेत सातारा जिल्ह्यात ११ कोटी रुपये अर्थसहाय्य महिला बचत गटांना देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली आहे.

सध्या राज्यभर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रे दरम्यान आज १६ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील बचत गटांना वेगवेगळ्या निधी बरोबरच राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून अत्यल्प व्याजदराचे अर्थसहाय्य वितरित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी खिलारी म्हणाले की, सातारा जिल्ह्यामध्ये विविध मायक्रो फायनान्स कंपन्या २४ ते ३६ टक्के इतक्या भरमसाठ व्याजाने कर्ज वाटप करून गरजू वंचित घटकांचे शोषण करत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी फायनान्स कंपन्यांच्या विळख्यात अडकलेल्या वंचित घटकांना उमेद अभियानाने बचत गटाच्या माध्यमातून संघटित केले आहे. त्यांची सावकारी कर्ज भागवण्याबरोबरच खावटी गरजा पूर्ण करण्यासाठी ७ टक्के इतक्या अल्पदरात राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून बचत गटांना प्रतिगट दीड ते तीन लाख रुपये पर्यंत कर्ज पुरवठा केला आहे.

उमेद अभियानात समाविष्ट बचतगटांना सन २०१९ पासून नोव्हेंबर अखेर बँकामार्फत एकूण ७०८ कोटी रुपयांचे बँक कर्ज वितरण करण्यात आलेले आहे. उमेद अभियानामार्फत २२.४१ कोटी फिरता निधी व १८ कोटी ७१ लक्ष समुदाय गुंतवणूक निधी वितरण करण्यात आले आहे.

कोपर्डे हवेलीत 3 कोटी 50 हजार रुपयांच्या अल्प व्याज दरातील कर्ज वाटप

कराड तालुक्यातील कोपर्ड हवेली येथे आज एका दिवसात तीन कोटी पन्नास हजार रुपये अल्प व्याज दरातील कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी विजय विभुते तालुका अभियान व्यवस्थापक निलेश पवार, माजी सरपंच नेताजी चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘उमेद’च्या माध्यमातून 700 कोटीचे कर्ज स्वरूपात महिलांना वाटप

उमेद अभियानाच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देऊन महिलांना कमी व्याजाची कर्ज उत्पादक गुंतवणूक याबाबत जागृत करून उद्योग व्यवसायासाठी ही त्यांच्या मागणीनुसार अल्प व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे. आज पर्यंत सातारा जिल्ह्यात सुमारे ७०० कोटी रुपये उमेद अभियानाच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात महिलांना देण्यात आले आहेत. यातून महिलांनी उद्योग व्यवसायाची उभारणी करून स्वतःची उपजीविका वाढवली आहे.या कर्जाची परतफेड ही नियमितपणे सुरू आहे.

स्वयंसहाय्यता समूहामध्ये 2 लाखाहून अधिक महिलांचे संघटन

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये सन २०१९ पासून इंटेन्सिव्ह पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. आजअखेर अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये २२ हजार ७७६ स्वयंसहाय्यता समूहामध्ये २ लाखापेक्षा अधिक महिलांचे संघटन करण्यात आलेले आहे. गावस्तरावर १ हजार १६८ ग्रामसंघ तसेच प्रभागस्तरावर एकूण ६१ प्रभागसंघ स्थापना करण्यात आलेली आहे. अभियानांतर्गत स्थापित स्वयंसहाय्यता समूहातील विविध सदस्य शेती आधारित उद्योग व्यवसाय तसेच बिगर शेती उद्योग व्यवसाय करीत असून विविध उत्पादने तयार करीत आहेत.