कराड प्रतिनिधी | सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री व चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या विरोधातील महायुती आणि काँग्रेस आघाडीत बिघाडी झाली. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून एकमत न झाल्याने कारखान्यासाठी तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे. 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
सह्याद्रि कारखान्यासाठी 214 उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते. अर्ज माघारीसाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. अर्ज मागे घेण्यासाठी सकाळपासूनच सत्ताधारी, विरोधी गटातील अनेक जण येत होते. मात्र, विरोधी गटात मेळ न बसल्याने त्याच्यात फूट पडल्याचे दिसून आले. सह्याद्रि कारखाना निवडणुकीसाठी 214 पैकी 144 उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली.
असे आहे पॅनल…
विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे उत्तर तालुका अध्यक्ष निवासराव थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांचे दुसरे पॅनेल, तर कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील रयत संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना यांचे तिसरे पॅनेल अशा तिरंगी लढतीचे संकेत मिळाले आहेत.