सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पर्यटनाची अनेक आकर्षक ठिकाणे आहेत, ज्यांना पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. या जिल्ह्यातील पर्यटन स्थळे इतकी मनोहारी आहेत की सिनेसृष्टीलाही त्याची भुरळ पडली आहे. सातारा जिल्हा देशातील सर्वोत्तम पर्यटन जिल्ह्यांपैकी एक मानला जातो.
वाई तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने विशेष समृद्ध आहे. महाभारतकाळातील विराट राजाची नगरी म्हणून वाईची ओळख आहे. येथे निसर्गसौंदर्यासोबत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे देखील आहेत. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले वाई हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथे कृष्णा नदीवर अनेक घाट आणि प्राचीन मंदिरे आहेत.
सरदार रास्ते यांनी वर्ष 1672 मध्ये एकाच दगडातून घडविलेली ढोल्या गणपतीची भव्य मूर्ती, सिध्देशार मंदिर, सिध्दनाथची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण आणि समर्थ रामदास स्वामी स्थापित रोकडोबा हनुमान मंदिर यासारखी अनेक मंदिरे येथे आहेत. या सर्व स्थळांचे आकर्षण पर्यटकांना खुणावते आणि सिनेसृष्टीला देखील प्रेरणा देते.
वाईचे आहे खास वैशिष्टय
स्वामी केवलनाद यांनी येथे वेदशास्त्राची शिकवण देणाऱ्या प्राज्ञ पाठशाळेची स्थापना केली. मराठी विश्वकोशाचे प्रकाशन वाई येथूनच होते. वाईहून पाचगणीकडे जातला पसरणीच्या घाटाच्या सुरुवातीलाच सरकारचे रेशीम उत्पादन केंद्र आहे. येथे 30 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड होत असून त्यावर रेशमी किडे पोसले जातात.
ढोल्या गणपती
ढोल्या गणपती मंदिरामुळे वाईची प्रसिध्दी वाढली आहे. गणपती आळीच्या घाटावर कृष्णा तीरी हे वाईतील सर्वात मोठे व भव्य मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले, गाभाऱ्यात गणपतीची पाषाणाची 6 फूट उंच व लांबी 7 फूट अशी बैठी मूर्ती आहे. मंदिराच्या भव्य सभागृहाच्या तिन्ही बाजूंनी कमानी आहेत. गणपती मंदिराजवळ काशिविश्वेश्वर शंकराचे मंदिर आहे. पूर्वेस महाव्दार व त्यावरती नगारखान्याची खोली आहे. मंदिरासभोवताली तटबंदीची उंच व रूट अशी भित आहे. महाव्दारातून आत गेल्यावर दगडी महर, दोन दीपमाळा व नंदी मंडप दिसतो. या नदीची भव्य मूर्ती कुळकुळीत जसा चकचकीत पाणी व सुबक आहे. सामान्य खालक खाली शिवलिंग आहे.
काळूबाई मंदिर, मांढरदेव
महाराष्ट्रामध्ये प्रसिध्द असलेले व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले काळुबाई देवीचे स्थान हे वाई तालुक्यातील मांढरदेवी डोंगरावर आहे. डोंगराच्या पठारावर मांढरदेव हे गांव आहे. या पठराची समुद्र सपाटीपासून उंची 4517 फूट आहे. काळूबाईचे मंदिर किमान 350 वर्षांपूर्वीचे आहे.
धोम धरण
वाईपासून सुमारे 10 कि.मी. अंतरावर असलेले धोम धरण प्रसिद्ध आहे. येथेच कृष्णा नदीच्या काठावर बांधलेले महादेवाचं मंदिर पाहण्यासारखं आहे. भुईज हे गाव सातारा-पुणे रस्त्यावर वसले आहे. भृंग ऋषींची समाधी येथे आहे. त्या नावावरुन या गावाला भुईज नाव पडले. मंदिराच्या खाली ऋषींची समाधी व ध्यान धारणेची खोली आहे.
मेणवली
वाई तालुक्यातील कृष्णा नदी काठी असलेले मेणवली गावात पेशवाईतील एक मुत्सद्दी व राजकारणी नाना फडणवीस यांचा गढीचा वाडा आहे. कृष्णा नदीच्या काठावरील केदार घाट व मंदिर प्रेक्षणिय आहेत. घटावरील एका छोट्या मंदिरात भली मोठी धातूची घंटा अडकविली आहे. वसई युध्दातील विजयानंतर चिमाजी अप्पा यांनी येथील किल्ल्यावरुन पोर्तुगीजांची ही एक क्विंटल वजनाची घंटा येताना विजय चिन्ह म्हणून आणली होती. नदी काठावरील घाट चंद्रकोरी आकाराचा असून मेणवलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. पांडव गड वाई शहरापासून 6 किमीवर वायव्य दिशेला हा गड आहे. चौकोनी आकाराचा माथा असलेला हा गड आहे. पन्हाळ्याचा शिलाहार राजा भोज याने इ.स. 1200 च्या दरम्यान हा किल्ला बांधला. गडावर जाण्यासाठी पहिला डोंगर चढून दुसरा उंच डोंगर चढावा लागतो. वाटेत विहीरी आहेत. पायवाट अरुंद व धोक्याची आहे. माच्यावर पाण्याची अनेक तळी आहेत. पडलेल्या वाड्याच्या मध्यभागी पांडजाई देवीचे व दुसरे एक अशी देवीची दोन मंदिरे आहेत.
वैराटगड किल्ला
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. वैराट गड हा वाई प्रांतात येणारा किल्ला आहे. वाई पासून 8 कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला एका दिवसात पाहून येऊ शकतो. 3 हजार 340 फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पायथ्याच्या गावापर्यंत जाणाऱ्या बसेस व इतर गाड्या यामुळे या परिसरातील भटकंती फारच सोपी आहे. वैराटगड हा शिलाहार राजा भोज याने अकराव्या शतकात बांधला. शिवकाळातही किल्ला केवळ एक लष्करी ठाणे म्हणूनच वापरात होता. शिवरायांनी जेव्हा वाई प्रांत जिंकला तेव्हा ह्या परिसरातील वैराटगड, पांडवगड हे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे 1818 मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. गडावर थोड्याफार प्रमाणात काही पडक्या वस्तूंचे अवशेष आहेत.
किल्ले कमळगड
धोम धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली आहे . दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा असलेल्या या डोंगररांगेतून काळ्या पाषाणाचा एक डोंगर मान वर काढून आल्यासारखा उंचावला आहे. त्याचे नाव आहे ‘कमळगड ‘. रुढार्थाने सर्व किल्ल्यांवर असणारी तट – बुरूज असे कोणतेच अवशेष या किल्ल्यावर नाहीत . पण या सर्वांहून न्यारा असा टवटवीत निसर्गाचा अमाप खजिना कमळगडास लाभला आहे.