सातारा प्रतिनिधी । शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी साताऱ्यातील १३ केंद्रांवर दोन सत्रांत पार पडली. या परीक्षेतील दोन्ही सत्रांत मिळून ७ हजार ८५९ म्हणजेच ९३ टक्के परीक्षार्थीनी उपस्थिती लावली. कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा सुरळीत पार पाडल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्हीची नजर ठेवली होती.
सातारा जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा शहरातील विविध केंद्रांवर झाली. सकाळी पहिल्या सत्रात साडेनऊ वाजल्यापासूनच उमेदवारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पावणेदहानंतर उमेदवारांना केंद्रामध्ये प्रवेश देण्यात सुरुवात केली. आतमध्ये गेल्यानंतर बोटांच्या ठशांचे बायोमेट्रिक व चेहरा स्क्रिनिंग करण्यात आला. दिव्यांग उमेदवारांना शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन नियमानुसार बैठक व्यवस्था देण्यात आली.
दुपारच्या सत्रातही सकाळच्या सत्रानुसार बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यापूर्वी टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या परीक्षेसाठी प्रशासनाने कडक नियमावली लागू केली होती. यावेळी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. प्रत्येक केंद्रावर गैरप्रकार टाळावा यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन लक्ष ठेवून होत्या. याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्तही सर्वच केंद्रावर ठेवण्यात आला होता.
‘या’ कागदपत्रांची करण्यात आली तपासणी
परीक्षार्थीना परीक्षा केंद्रावर घेताना प्रवेश पत्रासोबत आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड सोबत आणणे सक्तीचे करण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्या आधार कार्डची तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक परीक्षार्थीचे फेस स्कॅनिंग करून बोटांचे ठसे देखील घेण्यात आले.
१३ परीक्षा केंद्रांवर फेस स्कॅनिंग
परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक परीक्षार्थीचे फेस स्कॅनिंग करून बोटाचे ठसे घेण्यात आले. साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज, लाल बहादूर शास्त्री कॉलेज, महाराजा सयाजीराव विद्यालय, श्रीपतराव पाटील हायस्कूल, आण्णासाहेब कल्याणी विद्यालय, यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा, अनंत इंग्लिश स्कूल सातारा, कन्या शाळा सातारा, छत्रपती शाहू अकॅडमी सातारा, सुशीलादेवी कन्या प्रशाला सातारा, आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, भवानी विद्यामंदिर सातारा, न्यू इंग्लिश स्कूल सातारा या केंद्रांवर परीक्षे पार पडली.
शिक्षक पात्रता परिक्षा केंद्राच्या 13 ठिकाणी जमावबंदी आदेशामुळे शांतता
शिक्षक पात्रता परिक्षा सातारा शहरातील विद्यालय व महाविद्यालयांमध्ये 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 1 व दुपारी 2.30 ते 5 या वेळेत पार पडली. या अनुषंगाने परिक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे परिक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी नागेश पाटील यांनी लागू केले होते. दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 07.00 ते सांयकाळी 06.00 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या परीक्षा केंद्राचे परिसरात व त्या सभोवतालचे 100 मिटर परिसरात परिक्षार्थी, परिक्षेसाठी नेमलेले अधिकारी/कर्मचारी, सुरक्षा अधिकारी/कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आले. जमावबंदी आदेशाचे पालन करण्यात आल्याने परीक्षा शांततेत पार पडली.
टीईटीचा पेपर क्रमांक १
एकूण प्रविष्ट परीक्षार्थी – ३२९५
उपस्थित परीक्षार्थी – ३०७५
अनुपस्थित – २२०
एकूण उपस्थिती – ९३.३%
टीईटीचा पेपर क्रमांक २
एकूण परीक्षार्थी – ५१४७
उपस्थित परीक्षार्थी – ४७८४
अनुपस्थित – ३६३
एकूण उपस्थिती – ९२.९५%