सातारा प्रतिनिधी | एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. कित्येक पिढ्यांना या गावातून त्या गावात पोहोचविण्याचे काम एसटीने केले आहे. बदलत्या काळानुसार एसटीचे प्रवासी बदलत आहेत. राज्य परिवहन महामंडळ
प्रवाशांच्या सेवेसाठी बदलत आहे. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जीवनशैलीही बदलत आहे. आयटी क्षेत्रात काम करणारे तरुणही एसटीने जातात. त्यांच्या खिशात चार पैसेही असतात. त्यामुळे आरामदायी प्रवासाची ते अपेक्षा करतात. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात ई-बस दाखल झाल्या आहेत. त्यात आणखी सात गाड्यांची भर पडली आहे.
सरकारी नोकरीत असलेल्यांचे पगार वाढले आहेत. घरटी स्वतःच्या चारचाकी गाड्या आल्या आहेत. कोरोनानंतर तर अनेकांनी स्वतःच्या गाड्या खरेदी केल्या आहेत. नव्या पिढीतील प्रवाशांना जोडून ठेवण्यासाठी खासगी तत्त्वावर ई-बस गाड्या सेवेत आणल्या आहेत. यामध्ये सातारा विभागात यापूर्वीच नऊ मीटरच्या १५ गाड्या आणल्या होत्या. त्यात आता बारा मीटरच्या आणखी सहा गाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे प्रवास सुखकर होणार आहे.
अशा असतील फेऱ्या
- महाबळेश्वर-स्वारगेट सकाळी ६:३०, ७:३०. दुपारी २:३०, ३:३०.
- स्वारगेट-महाबळेश्वर सकाळी ११, दुपारी १२, रात्री ७, ८
- सातारा-निगडी वाकड मार्गे सकाळी ६, ७, दुपारी २:३०, ३:३०.
- निगडी-सातारा वाकड मार्गे : सकाळी ९:३०, १०:३०, सायंकाळी ५:४५, रात्री ६:४५
- सातारा-सोलापूर : रात्री ७, ९:३०.
- सोलापूर-सातारा : सकाळी १०:३०, दुपारी १.
एकदा चार्ज केल्यास 300 किलोमीटर
राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात नव्याने दाखल झालेल्या गाड्यांची क्षमता उच्च आहे. यामध्ये एकदा चार्ज केल्यानंतर तीनशे किलोमीटर प्रवास करू शकतात. त्यामुळे सोलापूर आदी लांब पल्ल्यालाही ई-बस गाडीची फेरी सुरू केली आहे.