कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. महाविकास आघाडीचा एकही उमेदवाराच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली नाही. मात्र, जिल्ह्याला महायुतीमधून नवनिर्वाचित तीन चेहरे आमदारकीच्या माध्यमातून मिळाले. आता महायुती मधील आठ आमदारांपैकी सात जणामध्ये मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यामध्ये मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पहावे लागणार आहे.
नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी सातारा जिल्ह्यातील तीन जणांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जाता आहे. मात्र, प्रत्यक्षात आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, आ. शंभूराज देसाई, आ. महेश शिंदे हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. सातारच्या पालकमंत्रीपदी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले की आ. मकरंद पाटील याची उत्सुकता लागून राहिली असून शिवसेनेतून शंभूराज देसाई की महेश शिंदे यांची वर्णी लागणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
…तर डॉ. अतुल भोसले, मनोजदादांपैकी एकाला मिळू शकते मंत्रीपद
यापूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. आता पुन्हा शंभूराज देसाईंसह शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, आ. महेश शिंदे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. सरकारने जर नवीन फार्मुला वापरला तर पहिल्यांदा आमदार झालेले डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. मात्र, पालकमंत्री होण्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले व मकरंद पाटील हे स्वप्न पाहत आहेत. आता त्यांचे स्वप्न सत्यात उतरणार की पुन्हा शंभूराज देसाई पालकमंत्री होणार याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.