कराड प्रतिनिधी | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र सातारा येथे होणार असून यासाठी जागेची पहाणी आज विद्यापीठाने नुकत्याच गठीत केलेल्या ७ सदस्यीय समितीने केली. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विविध महाविद्यालये, प्राध्यापक वर्ग, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठास मागणी केली होती.सदर सात सदस्यीय समितीच जागा निश्चिती करून तसा अहवाल विद्यापीठास सादर करणार आहे.
दरम्यान, या पहाणीवेळी समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, सदस्य प्रा.जगदीश सपकाळे(कोल्हापूर), प्रा.वर्षा मैंदर्गी (कोल्हापूर), प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे(सातारा), सिनेट सदस्य अमित कुलकर्णी (सातारा), अमित जाधव(तासवडे), सारंग कोल्हापुरे(सातारा), तलाठी सचिन शेटे आणी इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते.
सदर उपकेंद्रासाठी किमान 50 एकर जागा आवश्यक असून जास्तीत जास्त जागा मिळावी यासाठी समिती प्रयत्नशील आहे. या उपकेंद्रात विविध अभ्यासक्रम सुरु होणार असून हे मिनी विद्यापीठच असेल आणी नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्यातील सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ सुद्धा ठरू शकते. याठिकाणी होणाऱ्या प्रशासकीय कामामुळे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी, पालक, हजारो कर्मचारी, प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्थाचालक यांची कोल्हापूर वारी थांबणार आहे.
सदर समितीने सातारा शहर परिसरातील पाच जागांची पहाणी केली. यामध्ये सातारा पॉवरहाऊस, करंजे तर्फ, लिंबखिंड, आरफळ व क्षेत्रमाहुली याठिकाणी असलेल्या शासकीय जागांचा समावेश आहे. या उपकेंद्रात सुरु होणारे अभ्यासक्रम, लागणारे मनुष्यबळ याचाही अहवाल समिती सादर करणार आहे. सदर उपकेंद्रामुळे वेळ आणी पैसा याची बचत होणार आहे. सदर समितीने याअगोदर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी उपकेंद्रासाठी सकारात्मक भूमिका घेऊन त्वरित कार्यालयातील महसूल अधिकारी यांचेवर जबाबदारी देऊन लागेल ते सहकार्य समितीस करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, शाहूनगर येथील बॅ.पी.जी.पाटील यांचा बंगला त्यांनी शिवाजी विद्यापीठाला दिला आहे. उपकेंद्र येत्या शैक्षणिक वर्षात सुरु व्हावे या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरूपात उपकेंद्र या वास्तूत सुरु करता येईल का? याचीही समितीने पहाणी केली.