कराड प्रतिनिधी । सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमामध्ये माता व बालकांना गुणात्मक सेवा उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आलेली आहे. सुमन कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड केली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील लिंब (ता. सातारा), मल्हारपेठ (ता. पाटण), म्हसवड (ता. माण), पुसेसावळी (ता. खटाव), कातरखटाव (ता. खटाव), खटाव (ता. खटाव), तरडगाव (ता. फलटण) या 7 आरोग्य केंद्राची सुमन संस्था म्हणून निवड केली आहे.
सुमन कार्यक्रमाची उद्दिष्टेे
- लाभार्थींना उच्च दर्जाच्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा व संदर्भ सेवा देणे.
- उपलब्ध सोयी सुविधांची नियमित माहिती देणे.
- प्रभावी आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करणे.
- सामाजिक संघटनांची माता मृत्यूच्या नोंदणीसाठी मदत घेणे.
- मृत्यूच्या अन्वेषणासाठी जनजागृती निर्माण करणे.
- लाभार्थींच्या हक्कांबाबत जनजागृती करणे.
- लाभार्थ्याना गुणात्मक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रवृत्त करणे.
- कार्यक्रमाच्या नियमित आढाव्यासाठी सूकाणू समिती गठित करणे.
माता व बालकांना सर्व आरोग्य सेवा मोफत
टाळता येण्याजोग्या कारणांमुळे होणारे माता व नवजात बालमृत्यू व आजार हे संपुष्टात येतील व प्रसूतीचा सकारात्मक अनुभव प्राप्त होईल हे या कार्यक्रमाचे ध्येय आहे. प्रसूतीपूर्व व प्रसुती पश्चातचा कालावधी हे जीवनाचे महत्त्वपूर्ण घटनांचे टप्पे आहेत. या दरम्यान आलेले अनुभव हे महिलेला, बाळांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रभावित करतात. आरोग्य विभागाने सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत माता व बालकांना सर्व आरोग्य सेवा मोफत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षित गर्भधारणा, प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या देखभालीला प्रोत्साहन देणे या सुविधा देण्यात येणार आहेत.