जिल्ह्यात 66 हजार मतदार प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात मतदारांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे 65 हजार 893 मतदार वाढले आहेत. हे मतदार 20 नोव्हेंबरला प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नवमतदारांची संख्या सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

जिल्ह्यात एकूण 29 लाख मतदार असून, त्यापैकी केवळ 60 ते 63 टक्के मतदान होत असते. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रांची संख्या वाढवणे, मतदारांमध्ये प्रबोधन करणे, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर विशेष सोयीसुविधा उपलब्ध करणे इत्यादी पावले उचलली आहेत.

ज्या मतदारांनी अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतर केले आहे किंवा जे मतदार मयत झाले आहेत, अशी एक लाख 34 हजार नावे जिल्ह्याच्या मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत.

18 ते 25 वर्षे वयोगटातील मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात आले. त्या माध्यमातून जिल्ह्यात 65 हजार 893 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये फलटण विधानसभा मतदारसंघात 7,712, वाईमध्ये 8,103, कोरेगावमध्ये 7,178, माणमध्ये 9,812, कराड उत्तरमध्ये 7,878, कराड दक्षिणमध्ये 9,099, पाटणमध्ये 8,866 सातार्‍यामध्ये 7,245 नवमतदारांची नोंदणी झाली आहे.

नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने संपर्क सत्र गतिमान केले आहे. मतदार याद्यांच्या अद्ययावती करणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आणि घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली.

तृतीयपंथीय फक्त सात मतदार

सातारा जिल्ह्यात एकूण नवमतदारांपैकी 37 हजार 443 पुरुष आणि 28 हजार 443 महिला आहेत. त्याशिवाय तृतीयपंथीय सात मतदारांचा समावेश आहे.