Satara News : साताऱ्यात मान्सून ‘इतक्या’ टक्केच बरसला, दुष्काळ बनला गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याला यंदा वरूणराजाची कृपादृष्टी झाली नसल्याने त्याचा पिकांना चांगलाच फटका बसला. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या ४ महिन्यात अवघा ६५ टक्के पाऊस सातारा जिल्ह्यात बरसला असून त्यामुळे यंदा तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळी भागात पाझर तलाव, ओढे कोरडे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन सुरू असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

सातारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८८६.०२ मिलीमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. यंदा ३० सप्टेंबरअखेर फक्त ५७९.६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती. याचाच अर्थ यावर्षी तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट आहे. त्याचबरोबर सर्वच तालुक्यात कमी पावसाची नोंद झाली. यंदा कोणत्याही तालुक्यात १०० टक्के पाऊस झालेला नाही. यामध्ये सर्वात कमी पाऊस कोरेगाव तालुक्यात ४८ टक्केच झाला. तर सर्वाधिक पाऊस सातारा तालुक्यात ७६ टक्क्यांपर्यंत पडला आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील पावसाची स्थिती समजून येते.

सातारा जिल्ह्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे गणित सुरू होते. यंदा मात्र, हवामान विभागाने चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविलेला. पण, सातारा जिल्ह्यासाठी तरी हा अंदाज खोटा ठरलेला आहे. कारण, जूनपासून सप्टेंबरपर्यंतच्या पावसाळ्याच्या चार महिन्यात पावसाने सतत दगा दिला. मोठा पाऊस नसल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यात जिल्ह्यात फक्त ६५.०४ टक्केच पर्जन्यमानाची नोंद झाली.