सातारा प्रतिनिधी । अनेकजण सध्या नोकरीच्या निमित्ताने इतरत्र स्थायिक होऊ लागले आहेत. त्यामुळे आपल्या वाहनांचे आरसी बुकवर असलेले पत्ते बदलत आहेत. गेल्या ११ महिन्यांत ६० जण शहर सोडून गेले आहेत.
वाहन खरेदी केल्यानंतर वाहनाचे रजिस्ट्रेशन व महत्त्वाची इतर कागदपत्रे गरजेची असतात. कारण भविष्यामध्ये काही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी या कागदपत्रांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. यातीलच एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आरसी बुक होय. वाहन आरसीवरील पत्त्याचे तपशील ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने बदलले जाऊ शकतात.
सर्वाधिक दुचाकी नंबर वन
सर्वाधिक दुचाकी चालक आरसी बूकवरील पत्ता बदलत असतात. कारण दुचाकी विक्रीचे प्रमाण जास्त आहे. मात्र संबंधित नोंद परिवहन विभागातील दप्तरी केलीच जात नाही. त्यामुळे पत्ते बदललेले असतात.
लोक का बदलतात आरसीवरील पत्ता…
नव्या शहरात गेल्यानंतर तेथील पत्ता बदलण्याची अनेक कारणे आहेत. कायम त्याच शहरात भविष्यात वास्तव्य. पोलिसांनी गाडी पकडल्यानंतर प्रश्नांची सरबत्ती टाळण्यासाठी. वाहन पुन्हा विकताना अडचणी येऊ नयेत, अशी प्रमुख कारणे आरसीबूकवरील पत्ता बदलण्याची आहेत.
दिवसाला अनेकांचे पत्ते बदलण्यासाठी अर्ज
नोकरी, व्यावसायाच्या निमित्ताने अनेकजण मोठ्या शहरामध्ये वास्तव्याला जात आहेत. तेथे स्वतःचे घर खरेदी केल्यानंतर तिथला पत्ता आपल्या वाहनावर असावा, असे त्यांना वाटते. त्यामुळे पत्ता बदलण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात दिवसाला अनेकांचे अर्ज येत आहेत.
पत्ता बदलायचा तर तुम्ही काय कराल?
फॉर्म ३३, नवीन पत्त्याचा पुरावा, नोंदणी प्रमाणपत्र, पीयूसी प्रमाणपत्र, वैध विमा, वित्तपुरवठादार कंपनी वा बँकेने (फायनान्सर) जारी केलेली एनओसी (वाहनावर कर्ज असल्यास), पॅनकार्डची प्रमाणित प्रत किंवा फॉर्म ६० आणि फॉर्म ६१, स्मार्ट कार्ड फी पावती, चेसिस आणि इंजिन पेन्सिल प्रिट, मालकाची स्वाक्षरी अशी कागदपत्रे घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊ शकता.