सातारा प्रतिनिधी । राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ९ हजार ९६३ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यातील एकूण ६ हजार ५४२ प्रकरणे निकाली निघाली आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती. निना नि. बेदरकर यांनी दिली.
दि. १७ ते २१ मार्च २०२५ या कालावधीमधील स्पेशल डाईव्हमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ६७० प्रकरणे निकाली काढण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वैवाहिक वाद, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी केसेस, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वठल्याची प्रकरणे इत्यादींचा समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात फायनान्स कंपन्या, बँकांची कर्ज, दूरध्वनी व विद्युत देयके आणि ग्रामपंचायत, मालमत्ता पाणीपट्टी कर वसुली प्रकरणे इ. प्रकरणांचा समावेश होता.
जिल्ह्याचे ठिकाणी एकूण ७ आणि तालुका न्यायालयात एकूण २४ पॅनेल करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, यांनी काम पाहिले. प्रत्येक पॅनलवर एक विधिज्ञ पॅनल सदस्य म्हणून काम पाहत होते. राष्ट्रीय लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याचे प्राधिकरणाच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती. निना नि. बेदरकर यांनी सांगितले.
८१ कोटी ७४ लाख ६ हजार २२९ एवढी रक्कम वसूल
प्रलंबित २ हजार ५२२ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. त्यामध्ये एकूण २५ कोटी ५२ लाख ८१ हजार ६७० रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच वादपूर्व १५ हजार २३९ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी तडजोडीने ४ हजार २० प्रकरणे निकाली निघाली. वादपूर्व प्रकरणांमध्ये एकूण ८१ कोटी ७४ लाख ६ हजार २२९ एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.