सातारा जिल्ह्यातील 971 ग्रामपंचायतींमध्ये 6 हजार 485 शोष खड्ड्यांची कामे मंजूर

0
123
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सध्या शोष खड्डे काढण्याची कामे ग्रामीन भागातील खेडे गावांमध्ये केलीजात आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्वच्छ व सुंदर गावांच्या निर्मितीचे उद्दीष्ट ठेवल्यानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत उंबरठा तेथे शोष खड्डा मोहीम हा उपक्रम राबविला जात आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील 1 हजार 497 ग्रामपंचायतींपैकी 971 ग्रामपंचायतींमध्ये 6 हजार 485 कामे मंजूर झाली आहेत. त्यापैकी 161 गावातील 369 कामे पूर्ण झाली आहेत.

उघडी गटारे, त्यामध्ये तुंबलेले सांडपाणी, उघड्यावर सोडलेले सांडपाणी यामुळे डास, माशा यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. उघड्यावरील सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, हिवताप, मलेरिया सारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामुळे ग्रामीण जनतेचा मोठ्या प्रमाणावर आरोग्यावरील खर्च वाढला आहे. गटार बांधकामावर ही मोठ्या प्रमाणात खर्च होत असून गटारातून जाणारे सांडपाणी विहिरी, बोरवेल, ओढे, नदी, तलाव इत्यादी पाण्याचे साठे प्रदूषित करत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी उंबरठा तेथे शोषखड्डा ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यात 1 हजार 497 ग्रामपंचायती आहेत. त्यासाठी 2 लाख 24 हजार 558 शोष खड्ड्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. 971 गावांकडून 12 हजार 557 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 641 गावांमधील 6 हजार 485 कामे मंजूर झाली आहेत. त्यापैकी 233 गावांतील 591 कामे सुरु आहेत. तर 161 गावांमधील 369 कामे पुर्ण झाली आहेत. गावामध्ये उंबरठा तेथे शोषखड्डा घेण्यासाठी कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात आले असून दवंडी देऊन गाव बैठका घेऊन मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन कामाला गती दिली आहे. कुटुंबांचे शोषखड्डे तयार करण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकार घेतला आहे.