कराड प्रतिनिधी | गुप्तधनाच्या आमिषापोटी घरात चार फूट खड्डा खणून अघोरी पूजा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार राधानगरी तालुक्यातील कौलव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री सहा जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात अटक केल्या आरोपींमध्ये कराड आणि पाटण तालुक्यातील लोकांचा समावेश आहे.
कौलव गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. शरद धर्मा माने (रा. कौलव), महेश सदाशिव माने (रा. राजमाची, ता. कराड, जि. सातारा), आशीष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ (दोघे रा. मंगळवार पेठ, कराड, जि. सातारा), संतोष निवृत्ती लोहार (रा. वाझोली ता. पाटण, जि. सातारा), कृष्णात बापू पाटील (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राधानगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौलव येथील शरद धर्मा कांबळे या युवकाने घरात असलेल्या गुप्तधनप्राप्तीसाठी काही अघोरी प्रकार सुरू केला होता. त्याच्या राहत्या घरी देवाऱ्यासमोर चार फुटांचा खड्डा खणून विधिवत पूजा केली जात असल्याचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ राधानगरी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून या घरात धार्मिक विधी केले जात होते. याबाबत सरपंच कुंभार आणि माजी उपसरपंच व फिर्यादी अजित पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट घरात प्रवेश केला. त्यावेळी एका चटईवर केळीच्या पानावर हळद-कुंकू, सुपारी, नारळ, पानाचे विडे, टाचण्या मारलेली लिंबू अशी पूजा घातल्याचे दिसून आले. त्यातील संशयित आरोपी चंद्रकांत धुमाळ हा मंत्रोच्चार करत होता. त्याच्या गळ्यात रुद्राक्ष व वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घातलेल्या होत्या. त्याच्या शेजारी संशयित आरोपी शरद माने बसलेला होता.
आतील खोलीत देवघरासमोर चार फुटांचा खड्डा खणला होता. फिर्यादी पाटील यांनी आरोपींना याबाबत विचारले असता, संशयित आरोपी संतोष लोहार याने या खड्ड्यांमध्ये गुप्तधन मिळणार आहे. त्यासाठीच ही पूजा करत आहोत, असे सांगितले. संशयित आरोपी आशीष चव्हाण याने येथून निघून जा; अन्यथा तुम्हाला ठार मारीन, अशी धमकी दिली. ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच अजित पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.