सातारा जिल्ह्यातील 590 बांधकाम कामगारांना मिळाला ‘या’ योजनेतून 71 लाखांपेक्षा जास्त लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शासन आपल्यादारी अभियानामध्ये जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आला आहे. शासन आपल्यादारी अभियानांतर्गत कामगार विभागामार्फत जिल्ह्यातील 590 लाभार्थींना 71 लाख 3 हजार 800 रुपयांचे विविध शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य अनुदान याचा लाभ देण्यात आला आहे.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना 1 ली ते 7 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी 2 हजार 500 व 8 वी ते 10 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी 5 हजार रुपये प्रतिवर्षी देण्यात येतात. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 326 लाभार्थ्यांच्या पाल्यांना एकूण 10 लाख 95 हजार रुपयांचे लाभ देण्यात आले आहेत. तसेच 11 वी व 12 वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिकवर्ष 10 हजार रुपये देण्यात येतात. या अंतर्गत 61 लाभार्थ्यांना 6 लाख 10 हजार रुपयांचा लाभ दिला आहे.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यास तसेच पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी या हेतून 10 वी व 12 वी च्या वर्षात 50 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या पाल्यांना 10 हजार रुपये देण्यात येतात. या योजनेत जिल्ह्यात 25 लाभार्थ्यांना 2 लाख 50 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे पाल्य, पत्नी किंवा पती यांना पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाची पुस्तके व शैक्षणिक साहित्यासाठी प्रतिवर्षी 20 हजार रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत 109 लाभार्थ्यांना 21 लाख 80 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

व्यावसायीक शिक्षणासाठीही बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मदत करण्याची योजना राबवण्यात येते. या योजनेमध्ये पहिल्या दोन पाल्यांना, पत्नी, पतीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी 1 लाख व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी 60 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यात या योजनेचा 37 लाभार्थींना लाभ देण्यात आला असून एकूण 23 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

याशिवाय बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी 20 हजार आणि पदव्युत्तर पदविकेकरिता 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 31 लाभार्थींना 6 लाख 65 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. तर बांधकाम कामगाराच्या पाल्यांना संगणक शिक्षण (एमएससीआयटी) करिता शुल्क प्रतिपूर्तीही दिली जाते. या योजनांच्या लाभासाठी बांधकाम कामगार नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. तसेच हा लाभ त्याच्या पहिल्या दोन पाल्यांनाच दिला जातो.