कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत ८५ वर्षांवरील, दिव्यांग आणि अंध मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कराड दक्षिण मतदारसंघात ८५ वर्षांवरील ३ हजार ५२४, तर कराड उत्तरमध्ये ४ हजार ९५ मतदार आहेत. त्यापैकी दक्षिणमधील ३३०, तर उत्तरमधील २४७ मतदारांचे १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान घरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक वय १०२ वर्षे असणाऱ्या श्रीमती पारुबाई गोविंद भाष्टे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.
विधानसभा निवडणुकीची निवडणूक यंत्रणेकडून कऱ्हाड उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.
कराड दक्षिणमध्ये ८५ वर्षांवरील एक कराड दक्षिण मतदारसंघात तीन हजार ५२४ मतदार आहेत. त्यामध्ये ३३० चे मतदार हे वयोवृद्ध असून, त्यातील वे अनेकांना हालचाल करिता येत नाही, न काही आजारी आहेत. त्यांचे मतदान हे निवडणूक कर्मचारी यांच्याकडून घरी जाऊन घेतले जात आहे. उर्वरित ८५ वर्षांवरील तीन हजार १९४ मतदार हे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी रिक्षासह अन्य १९२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कराड उत्तरमध्ये चार हजार ९५ मतदार हे ८५ वर्षांवरील मतदार आहेत.त्यापैकी २४७ मतदार हे घरून मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाकडून घरूनच मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित तीन हजार ८४८ मतदार हे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार आहेत.