कांटे की टक्कर झाली आता 57 अपक्ष, कोणाचे गणित बिघडविणार!; 5-10 हजार मते घेतली तरी पडणार भारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले. एकूण १०९ उमेदवार मैदानात उतरले असून यामध्ये तब्बल ५७ अपक्षांचा समावेश आहे. यामुळे आठही मतदारसंघांत सर्व अपक्षांनी मिळून पाच-दहा हजार मते घेतली तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे गणित बिघडणार आहे. उद्या मतमोजणी होणार असून हे अपक्ष नेमकं कोणाचे गणित बिघडवणार? हे स्पष्ट होईल.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठही मतदारसंघात काटे की टक्कर पहायला मिळाली. अगदी घराण्यापर्यंत आणि अरे तुरे पर्यंत उमेदवारांच्या तोंडून टीका टिप्पणी झाली. एकूण आठ विधानसभा मतदार संघात आठ आमदारकीच्या जागेसाठी १०९ उमेदवार नशीब अजमावत आहेत; पण खरी लढत महाविकास आघाडी आणि महायुतीतच पहायला मिळाली आहे. तरीही दोन मतदारसंघांत बंडखोरांनी रंगत आणली. त्यातच सर्वच मतदारसंघांत ५७ उमेदवार अपक्ष म्हणून लढल्यामुळे ते किती मते घेणार?, यावरही प्रमुख उमेदवारांचे गणित अवलंबून असणार आहे.

जिल्ह्यातील माण आणि कोरेगाव मतदार संघात प्रत्येकी 12 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले. कोरेगावमध्ये शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात खरी लढत झाली असून मागील निवडणुकीत अवघ्या सहा हजार मतांच्या फरकाने महेश शिंदे यांचा विजय झालेला. आताच्या निवडणुकीत अपक्ष किती मते घेणार यावर दोघांचाही फैसला होणार आहे. माणमध्ये मागीलवेळी भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा ३ हजार मतांनी विजय झालेला. आता त्यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रभाकर घार्गे आहेत. याठिकाणीही जोरदार लढत आहे. त्यामुळे १२ अपक्ष किती मते घेणार यावरच जय- पराजयाचे गणित अवलंबून आहे.

फलटण मतदारसंघात भाजपचे सचिन कांबळे-पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांच्यातच दुरंगी लढत पहायला मिळाली. मात्र या ठिकाणी ७ अपक्ष उमेदवारांनि देखील नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला असल्याने येथेही दोघांपैकी कोणाला तरी दगाफटका होण्याची शक्यता आहे. सातारा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उद्धवसेनेचे उमेदवार अमित कदम यांच्यात सामना झाला आहे. या मतदार संघात अपक्ष तिघे जण असले तरी त्यांचा फारसा फरक पडणार नाही. वाईत मात्र अपक्ष व शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख यांच्या बंडखोरीने गणिते बदलणार हे नक्की.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील आणि शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांच्यात लढत झाली आहे. शरद पवारांनी ऐनवेळी बाहेर काढलेला हुकमी एक्का म्हणजे जाधव किती मते घेतात हे या मतदार संघात महत्त्वाचे ठरणार आहे. कराड दक्षिणमध्ये अपक्षाचा फारसा प्रभाव झाला नसला तरी या ठिकाणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे अतुल भोसले यांच्यात काटे कि टक्कर झाली आहे.

कराड उत्तर मतदारसंघात दुरंगीच सामना चांगलाच रंगला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे मनोज घोरपडे पुन्हा समोरासमोर आले. मात्र, या ठिकाणी ८ अपक्ष मैदानात उभे राहिले. ते किती मते घेणार यावरही विजयाचा फैसला होऊ शकतो.