कराड प्रतिनिधी । राज्य सरकारच्यावतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम ग्रामीण भागात राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत सातारा जिल्हा परिषद, सातारा व पंचायत समिती शिक्षण विभाग, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथे शिक्षण घेत असलेल्या 57 दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या 88 साहित्य साधनांचे वितरण करण्यात आले.
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण हॉल (बचत भवन) येथे नुकताच दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कराड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सन्मति देशमाने, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट, शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलाणी व रमेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमात नवोदय परीक्षेत कराड तालुक्यातून यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
श्रवणयंत्रांपासून ते व्हील चेअर साहित्याचे वाटप
कराड येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात कराड विकास गटातील 57 दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या 88 साहित्य साधनांचे वितरण करण्यात आले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना (श्रवणयंत्र- 52, व्हील चेअर- 21, मॉडीफाय चेअर- 08, ब्रेल किट- 02, पांढरी काठी- 02, लो-व्हिजन किट- 02, किमोड चेअर- 01) आदी साहित्य वितरीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन शकुंतला देवकांत यांनी केले. या कार्यक्रमासाठी गटसाधन केंद्रातील सर्व विशेष शिक्षक व विषयतज्ञ उपस्थित होते.