सातारा प्रतिनिधी । सातारा येथे नुकतीच जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. यावेळी जिल्ह्यातील छोट्या उद्योजकांपासून मोठया उद्योजकांनीही गुंतवणुक करण्याकरिता पुढाकार घेतला. यावेळी एकूण 56 उघोजकांकडून 1 हजार 150 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीतून सातारा जिल्ह्यात भविष्यात 2 हजार 800 नवीन रोजगार निर्मिती होणार आहे.
सातारा येथील मास भवनमध्ये मास भवन विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद झाली. यावेळी पुणे विभागाचे सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ मास अध्यक्ष राजेंद्र मोहिते, मास सचिव धैर्यशील भोसले यांच्यासह विविध उद्योजक, प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी गुंतवणूक परिषदेस उपस्थित राहिलेल्या उद्योजकांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी आवश्यक त्या पायाभूत सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागात उद्योजकांनी गुंतवणूक करावी. सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटन क्षेत्रातही मोठ्या रोजगाराच्या मोठ्या संधी असून त्याकडे जिल्ह्यातील उद्योजकांनी एक संधी म्हणून पहावे. त्याबरोबरच उद्योगांना कोणतीही मदत आवश्यक असल्यास जिल्हा प्रशासन सदैव तत्पर आहे.