सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेकडील विविध पदांच्या पदभरतीसाठी जिल्ह्यातील तीन परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. तब्बल 1 हजार 325 उमेदवारांनी परीक्षा दिली असून 553 परीक्षार्थींनी दांडी मारली आहे.
जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. पदभरतीसाठी दि. 7 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष परीक्षेला प्रारंभ झाला.
कनिष्ठ अभियंता स्थापत्य व ग्रामीण पाणी पुरवठा या विभागासाठी सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, गोडोलीतील आयटी पार्क व कराडच्या मंगळवार पेठेतील महिला महाविद्यालय या तीन केंद्रावर परीक्षा झाली. कनिष्ठ अभियंता पदासाठी 1 हजार 876 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 हजार 325 उमेदवारांनी परीक्षा दिली.
सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनामार्फत देण्यात आली. दरम्यान, वरिष्ठ सहाय्यक पदासाठी गुरूवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, गोडोली आयटी पार्क व कराड येथील महिला महाविद्यालय याच तीन केंद्रांवर परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली.