सातारा जिल्ह्यात 55 हजार कामगारांनी ऑनलाईन नोंदणी; अनेक योजनांचा मिळतोय लाभ

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्यातील व जिल्हयातील बांधकाम कामगारांना आता मासिक एक रुपया शुल्क भरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करता येणार आहे. अशा नोंदणीकृत कामगारांना घरकुल, गृहकर्जासह शासनाच्या विविध 32 योजनांचा लाभ घेता येणार असून यासाठी तालुकानिहाय 12 कामगार सुविधा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यात सुमारे 55 हजार कामगारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

विविध क्षेत्रातील अकुशल, कुशल कामगारांसाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून त्यांना विविध प्रकारचे लाभही दिले जातात. त्यांना कामगार आयुक्त कार्यालयातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करावी लागणार आहे.

पूर्वी या नोंदणीसाठी 25 रुपये शुल्क भरावे लागत होते. आता नवीन धोरणानुसार मासिक केवळ एक रुपया भरुन नोंदणी करता येणार आहे. अशा कामगारांना घरकुल योजनेच्या माध्यमातून घरच नाही तर इतर महत्त्वाच्या योजनांचा देखील लाभ मिळणार आहे.

सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने तालुकानिहाय कामगार सुविधा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. यात सातारा तालुक्यासाठी मोळाचा ओढा, वाई तालुक्याला रामडोह आळी, महाबळेश्वर तालुक्यासाठी हनुमान रोड पाचगणी, जावली तालुक्यास वेण्णा चौक मेढा, खंडाळा तालुक्यास छत्रपती संभाजी महाराज चौक, कोरेगाव तालुक्यास उत्कर्ष गुरुदेव नगर,

खटाव तालुक्यास वाकेश्वर रोड वडूज, माण तालुक्यास मायणी रोड दहिवडी, फलटण तालुक्यासाठी फलटण विमानतळा जवळ, कराड तालुका शनिवार पेठ, पाटण तालुक्यासाठी चापोली रोड तर कराड उत्तरसाठी रॉयल हॉटेल पार्क बनवडी येथे सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे.