सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याची ओळख हि अनेक गोष्टींमुळे आहे. त्यामध्ये खास करून पर्यटन आणि ऐतिहासिक जिल्हा म्हणून साताऱ्याची खास ओळख आहे. या जिल्ह्यात असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असं गाव आहे कि त्या गावात एक नाही पन्नास अति प्राचीन स्मृतिशिळा आढळतात. सातारा शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर परळी खोरे गावामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर असून या मंदिराजवळ अनेक प्राचीन स्मृतीशिळा, वीरगळ यांचे जतन मोठ्या प्रमाणावर केले आहे. स्मृतीशिळा वरचा इतिहास शूरवीरांचा असल्याचा निदर्शनास येते. अशा 55 स्मृतीशिळाचे खुले संग्रहालय सातारा जिल्ह्यातील परळी खोरे गावामध्ये आहे.
ज्यावेळी परळी खोरे गावातील काही भागात खोदकाम करण्यात आले तेव्हा त्यावेळी इतिहास अभ्यासकांना आणखी काही वीरगळी आढळून आल्या. वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या चिन्हांचे, त्यांच्या परंपरा, त्या काळातील शस्त्र, वेशभूषा, अलंकार याचे चित्रीकरण यावर आहे. या वीरगळी शेकडो वर्षापूर्वीच्या असल्याचे देखील सांगण्यात आलं आहे.
त्या काळातील युद्धांच्या इतिहासाचं चित्रीकरण या शिळामार्फत केल्याचे देखील इतिहास अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. या सोबतच उल्हाट यंत्र नावाच्या एका प्राचीन रणयंत्राचे चित्रकरण असल्याच्या दोन स्मृतीशिळा सापडल्या आहेत. या स्मृतीशिळा भारतात पहिल्यांदाच आढळून आल्या आहेत. परळी खोरे गावात 55 वीरगळ आहेत. महादेव मंदिरच्या आवारात एका लाईनीमध्ये ठेवून त्या जतन करण्यात आलेल्या आहेत.