सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात सिंचन प्रकल्पांमध्ये वाढ झाल्यामुळे ऊस क्षेत्र देखील वाढले आहे. परिणामी जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यात मोठी वाढ झाली असून सहकारी साखर कारखान्याच्या त्याबरोबरीने खासगी कारखाने देखील वाढले आहेत. जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला गती आली असून मजूर यंत्रणा विस्कळीत असल्याने अनेक कारखान्यांना उद्दिष्ट गाठताना अडचणी येत आहेत. आतापर्यंत नऊ सहकारी व आठ खासगी साखर कारखान्यांनी ६० लाख ४८ हजार ३२३ टन उसाचे गाळप करून ५५ लाख ३० हजार ४४० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान गाळप सुरू झाले आहे. तोडणी वाहतूक यंत्रणा यावेळेस विस्कळित झाली आहे. ऊस वेळेत तुटावा, यासाठी हार्वेस्टरचा वापर अधिक केला जात आहे. यावेळेस नऊ सहकारी व आठ खासगी असे १७ साखर कारखान्यांतून गाळप सुरू आहे.
हंगाम उशिरा सुरू झाल्याने शेतकरी संघटनांनी थोडी नमती भूमिका घेतली असली, तरी २८०० ते ३२०० रुपये पहिली उचल गेली आहे. सहकारी कारखान्यांचा सरासरी १०.९३ व खासगी कारखान्यांचा सरासरी ७.६९ टक्के उतारा मिळत आहे. कारखान्यांत रयत अथणी शुगरला ११.७८ टक्के उतारा मिळाला, तर गाळपात खासगीमध्ये ‘जरंडेश्वर’ने आघाडी घेत सर्वाधिक दहा लाख ८९ हजार ९८० टन, तर सहकारीत कृष्णा कारखान्याने सहा लाख ६२ हजार ७२० टन उसाचे गाळप केले आहे.