जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.1 टक्के मतदान, पारा कमी होताच वाढल्या मतदारांच्या रांगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली. सकाळच्या वेळी जिल्ह्यात राजकीय मंडळींनी व काही ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला तर काही ठिकाणी उन्हामुळे निरुत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी सायंकाळीं पाच वाजेपर्यंत 54.1 टक्के मतदानाची नोंद झाली. कराड तालुक्यात मतदानासाठी महिलांमध्ये चांगला उत्साह वाढलेला दिसून आला.

सातारा शहरात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. प्रत्येक मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे दुपारपर्यंत कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सातारा शहरातील मतदान केंद्रांवर वैद्यकीय मदत कक्ष, दिव्यांग कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. गोडोली येथील हे मतदान केंद्र बांबू उत्पादने आणि त्याचे उपयोग या थीमवर सजवण्यात आले होते. येथे मतदान करणाऱ्या मतदार राजाला बांबूची रोपे भेट देण्यात येत होती.

गोडोलीत ‘बांबूच्या मतदान केंद्रा’ने वाढविला मतदारांचा उत्साह

सातारा शहरातील गोडोली याठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून बांबूचे मतदान केंद्र बनविण्यात आले आहे. त्याचे प्रवेशद्वारही बांबूंच्या काठ्यापासून बनविण्यात आल्याने ते एखादे हॉटेल असल्यासारखा भास सुरुवातीलाच होतो. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी या मतदानकेंद्रात प्रवेश केल्यानंतर पायाखाली रेड कार्पेड आणि डोक्यावर बांबूचेच छप्परही करण्यात आले आहे. दोन्ही बाजूला बांबूपासून बनविलेल्या सूप, सूपड्या, पाट्या लावण्यात आल्या असून याचा कॉरिडॉरही बांबूच्या काठ्यापासून तयार करण्यात आला आहे. एखाद्या पूलावरूनच मतदानकेंद्रात प्रवेश केल्यासारखे याठिकाणी वाटते.पायाखाली रेडकार्पेट आणि डोक्यावर बांबूंचे छत, त्यातून अलगद चेहऱ्यावर पडणारी सूर्यकिरणे मतदारांचा उत्साह आणिखी वाढवत असतात. याच वातावरणात आपण मतदान केंद्रात प्रवेश करतो. त्यावेळी आजूबाजूला बांबूंचे आकाशकंदील लक्ष वेधून घेतात. गोल, चौकोनी आणि षटकोनी आकाराचे हे आकाशकंदील अत्यंत सुंदर कलाकुसरीच्या सहाय्याने बनविलेले.