सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाकडून महिलांसाठी अनेक आरोग्यदायी योजना राबविल्या जात आहेत. त्याअंतर्गत ‘किलकारी’ ही गर्भवती महिला आणि मातांसाठी नवीन योजना नुकतीच सुरू करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातही याला प्रारंभ झाला आहे. या योजनेतून आता जिल्ह्यातील ५१ हजार गर्भवती महिलांची काळजी घेतली जाणार आहे.
राज्यात सर्वत्र केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ ही नवीन योजना आणि आशा सेविकांसाठी मोबाइल अकादमी सुरू करण्यात आलेली आहे. ‘किलकारी’ म्हणजे बाळाचे खिदळणे. ही केंद्रीकृत संवादात्मक ध्वनिप्रतिसाद आधारित मोबाइल आरोग्यसेवा आहे. सातारा जिल्ह्यातही या योजनेला सुरुवात झाली आहे.
जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. महेश खलिपे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हया ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेला गावातील आशा सेविकेकडे नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये नोंदणीकृत गर्भवती महिलेला चाैथ्या आठवड्यापासून बाळ एक वर्षाचे होईपर्यंत औषधे, आहार, लसीकरण, मानसिक आणि शारीरिक स्थिती आदींबाबत मोबाइलवर मोफत मार्गदर्शन मिळणार आहे; तर सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी डिसेंबर महिना अखेरपर्यंत सुमारे ५१ हजार गर्भवती महिलांची नोंद झालेली आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.