सातारा प्रतिनिधी | आर्थिक गर्तेत सापडलेल्या सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा येथील किसनवीर-खंडाळा साखर कारखान्याला एनसीडीसीकडून 500 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. भ्रष्ट व नियोजनशून्य कारभारामुळे किसनवीर कारखाना आर्थिक गर्तेत सापडला होता.
कारखान्यावर सुमारे एक हजार कोटींचे कर्ज असल्याने हा कारखाना लिलावाच्या प्रक्रियेत जातो की काय, अशी अवस्था होती. दरम्यान, एनसीडीसीकडून किसनवीरला 350 कोटी, तर किसन वीर-खंडाळा कारखान्यासाठी 150 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यामुळे या कारखान्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.
आधीच्या व्यवस्थापनाने कारखान्यावर विविध उपक्रम राबवले; परंतु त्यातून कोणाचा फायदा झाला, हे सर्वज्ञात आहे. कारखान्यावरील कर्जाचा बोजा वाढत गेला. परिणामी शेतकरी व कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. 2020-21 च्या हंगामात गाळपास आलेल्या उसाची बिले थकीत होती. कामगारांचे 25 महिन्यांचे पगार रखडले होते. कामगारांची पीएफची रक्कम भरली गेली नव्हती. व्यापारी देणी आणि बँकांची देणी थकीत होती. कोणतीही बँक नवीन कर्ज देत नव्हती.