सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील चिमुकल्यांना खेळण्यासाठी आणि नागरिकांना क्षणभर विश्रांती घेत यावी यासाठी सातारा पालिकेने शहरासह हद्दवाढ भागात एकूण ५० उद्यानांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्यानांच्या पायाभूत सुविधांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. ५० पैकी सात उद्यानांच्या कामास मंजुरी मिळाली असून, लवकरच कामकाजास सुरुवात होणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या सातारा पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पायाभूत सुविधांचा अंतर्भाव असलेला ४८९ कोटी ३५ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शहरात शाश्वत वीजनिर्मिती करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी ठोस उपाय राबविण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. पर्यावरण संवर्धनाचा एक भाग म्हणून शहरासह हद्दवाढ भागात एकूण ५० उद्यानांची निर्मिती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पालिकेच्यावतीने ही उद्याने उभारण्यासाठी कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच ही उद्याने कार्यरत होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुरू झाले काही उद्यानांचे काम…
सातारा शहरात पहिल्या टप्यात पेढ्याचा भैरोबा, एसटी कॉलनी, फॉरेस्ट कॉलनी, रांगोळे कॉलनी, शाहूपुरी, चिमणपुरा पेठ, अजिंक्यतारा किल्ल्यावरील अजिंक्यतारा स्मृती उद्यान, गोडोली, विलासपूर भागात उद्याने निर्माण केली जाणार आहेत. बहुतांश उद्यानांचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अशा असणार सुविधा…
सातारा शहरात आवश्यक ठिकाणी पायाभूत सुविधा, संरक्षक भिंती, ग्रीन लॉन्स, लहान मुलांसाठी खेळणी, आकर्षक रचना याशिवाय नाना- नानी पार्क, वॉकिंग ट्रॅक, पथदिवे, कारंजे अशा विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. खास ज्येष्ठांसाठी शहरात तीन ठिकाणी विरंगुळा केंद्र देखील उभारले जाणार आहे.