कराड प्रतिनिधी । काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी सहकारमंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना दूध संघाची उभारणी करण्यात आली. हा संघ आज यशस्वीपणे आपले काम पाहत आहे. या दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत 17 जागांसाठी केवळ 16 अर्ज वैध्य ठरवण्यात आले. त्यामुळे 16 उमेदवारांची बिनविरोध संचालक म्हणून निवड करण्यात आली तर 1 जागा रिक्त राहिली आहे.
कोयना दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक संदीप जाधव यांनी काम पाहिले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवानेते ॲड. उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक उत्साहपूर्ण वातावरण पार पडली. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, सुदाम चव्हाण, शिवाजी शिंदे, लक्ष्मण देसाई, शिवाजी गरुड, शिवाजी जाधव, शंकर पवार, दीपक पिसाळ, तानाजी शेवाळे, धनाजी पाटील, अशोक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.
तसेच निवडणुकीत महिला प्रवर्गातून उज्वला माने, निता निकम, इतर मागासवर्ग प्रवर्गातून बाबुराव धोकटे, भटक्या जमाती प्रवर्गातून शिवाजी गावडे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणुकीत निवड प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे अनुसूचित जाती जमाती गटातून एक जागा रिक्त राहिली. कोयना युद्ध संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवानेते ॲड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.