पुणे – सातारा रस्त्यावर एकाच दिवशी 5 वाहनांची धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा रस्त्यावर शनिवारी सकाळच्या सुमारास विचित्र अपघाताची घटना घडली. एका मागून पाठोपाठ पाच वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र अपघातानंतर सुमारे तीन तासानंतर याठिकाणी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सातारा रस्त्यावर शुक्रवारी रात्री एक टेम्पो दुभाजक तोडून खांबाला धडकला होता. या अपघातामुळे दुभाजकाचा पत्रा तूटून रस्त्यावर पडला होता. रस्त्यावर मोठा पत्रा आडवा पडल्याने सदर ठिकाणी एक एसटी बस, एक पिकअप, एक मोटारगाडी ही तीन वाहने थांबली होती. तितक्यात पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने या तीन वाहनांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात चारचाकी कार उड्डाणपुलावरुन खाली कोसळली.

तर एसटी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुलावरून कोसळली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. या ठिकाणी अपघातानंतर सुमारे तीन तास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची क्रेन अपघात स्थळी आली नाही. त्यामुळे खासगी क्रेन लावून या अपघातातील वाहने बाजूला घेण्यात आली. मात्र, या झालेल्या उशीरामुळे याठिकाणी सुमारे तीन तास वाहतूक कोंडी झाली. त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.