लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 5 हजार बॅलेट युनिट तयार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघात उद्या दि. 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. निवडणूक कामकाजासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने ११ हजार १५५ इतके मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केले आहे. सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विधानसभेच्या सहा मतदार संघांसाठी निवडणूक आयोगाकडून पाच हजार ६५४ बॅलेट युनिट, तीन हजार ३३९ कंट्रोल युनिट व तीन हजार ४३१ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत.

निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशिन हाताळण्याच्या प्रशिक्षणासह निवडणूक कामकाजाबाबत आवश्यक ते सर्व प्रशिक्षण दोन वेळा देण्यात आले आहे. तिसरे प्रशिक्षण आज दि. 6 मे रोजी होणार आहे. मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मिनी बस ३९, एसटी बस ४२६, दुर्गम मतदान केंद्रासाठी 2 बोट देण्यात आलेल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये आवश्यक असणारे सर्व साहित्य विविध शासकीय मुद्रणालय यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. इंटरनेट कमी क्षमतेने उपलब्ध असलेल्या भागात ३१ मतदान केंद्रे असून, या ठिकाणी संपर्क होण्यासाठी वॉकीटॉकी व रनर या मार्गाने संपर्क करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.