कृषी विभागाची धडक कारवाई : 15 दुकाने निलंबीत तर 3 दुकानांचा परवाना कायमस्वरुपी रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज असून खते, बियाणे, किटकनाशकांबात फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागही सतर्क आहे. यासाठी कृषी निविष्ठा दुकानांवर वाॅच ठेवण्यासाठी १२ भरारी पथके कार्यरत आहेत. कृषी विभागाने आतापर्यंत तपासणीत दोषी आढळलेल्या १५ दुकानांचा परवाना निलंबीत तर तीनचा कायमस्वरुपी रद्द केला आहे. त्यामुळे दुकानदारांत खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. यंदा खरीपाचे सर्वसाधारणपणे २ लाख ९० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सुमारे ७५ हजार हेक्टर राहणार असून यानंतर बाजरीचे ६० हजार, भात ४४ हजार, खरीप ज्वारीचे ११ हजार, भुईमूग २९ हजार आणि मकेचे १५ हजार हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. तर इतर पिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे.

या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागही सज्ज झाला आहे. कारण, शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि किटकनाशके लागतात. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाच्यावतीने लक्ष ठेवण्यात येते. आताही कृषी विभागाने दुकानांची तपासणी करुन कारवाईस सुरूवात केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यासही दुकानांची तपासणी करण्यात येत आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यात भरारी पथकाने कारवाई केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ कृषी निविष्ठा दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर तीनचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. रद्द झालेले तीनही दुकाने ही पाटण तालुक्यातील आहेत. तर निलंबितमधील १४ दुकाने ही पाटण तर एक कऱ्हाड तालुक्यातील आहे.

शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांची गय केली जाणार नाही : भाग्यश्री फरांदे

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी १२ भरारी पथकांकडून कृषी निविष्ठा दुकानांवर लक्ष ठेवले जाणार आहे. पथके अचानक भेट देऊन तपासणी करत आहेत. तर आतापर्यंत १५ कृषी निविष्ठा दुकानांचे निलंबन तर तीनचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.