सातारा प्रतिनिधी । नागपंचमीनंतर वेध लागतात लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. सध्या बाप्पांच्या आगमनाची आबालवृद्धांना प्रतीक्षा लागली असून राज्य शासनानेही सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मोठ्या बक्षिसांची घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राज्यातील प्रथम तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. दि. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरून या स्पर्धेत मंडळांना सहभागी होता येणार आहे.
सातारा जिल्ह्यात गणेशोत्सव सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. विविध गणेश मंडळे उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम करतात. अशा मंडळांच्या पंखांना बळ देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून यंदा गणेश मंडळांसाठी स्पर्धा भरविण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ई-मेल आयडीवर दि. ३१ ऑगस्टपूर्वी परिपूर्ण अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
प्राप्त शिफारशींमधून गुणांकन आणि कागदपत्रांच्या आधारे पहिल्या तीन विजेत्या मंडळांची निवड केली जाणार आहे. तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित पात्र मंडळांना शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निकष काय?
राज्य शासनाच्या या स्पर्धेत सहभागो होण्यासाठी काही निकष ठेवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ज्या मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेली असेल, स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेली असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.
यासाठी मिळणार गुण
या स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, संस्कृतीचे जतन, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, ध्वनिप्रदूषण विरहित वातावरण याची पाहणी केली करून गुण दिले जातील.
जिल्हास्तरावर समिती
स्पर्धेत सहभागी सार्वजनिक गणेश मंडळांची जिल्हास्तरीय समितीकडून पाहणी केली जाणार आहे. या समितीकडून मंडळांना गुण दिले जाणार आहेत. यानंतर जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या मंडळामधून राज्यस्तरीय समिती प्रथम तीन मंडळाची निवड करणार आहे.