सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना हेक्टरी ६ लाख ९० हजारांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत पावसाळ्यात शेतीच्या बांधावर आणि जमिनीवरही ९५२ हेक्टरमध्ये ५ लाख ८५ हजार रोपे लावण्यात येणार आहेत.
राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून बांबू लागवडीसाठी नवीन योजना आणली आहे. या अंतर्गत सातारा आणि लातूर या दोन जिल्ह्यांची निवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठी ६ लाख ९० हजार रुपये अनुदान दिले जात आहे. हे तीन वर्षांसाठी मिळणार आहे. या बांबू लागवडीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामध्ये हे झाड लावल्यानंतर ४० वर्षांपर्यंत उत्पन्न देते. यासाठी पाणीही देण्याची गरज नसते, तसेच बांबूपासून अनेक वस्तू बनतात. बांबूला चांगली बाजारपेठही उपलब्ध आहे. त्यामुळे बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही बांबू लागवड सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही. आता कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागानेही बांबू रोपे लागवडीची तयारी केलेली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर ५ लाख ८५ हजार बांबू रोपे लावण्यात येणार आहेत. शेतीचे बांध आणि जमीन, तसेच माळरानावर ही रोपे लावली जातील. यासाठी १ हजार ३२५ शेतकरी लाभार्थी झालेत.