सातारा प्रतिनिधी | पालिकेची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले २५ फ्लेक्स बोर्ड बुधवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून जप्त करण्यात आले. संबंधित फ्लेक्सधारकांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रति १० हजार रुपये सेवा शुल्क वसूल केले जाणार आहे, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी दिली.
सातारा शहरात फ्लेक्स लावण्यासाठी पालिकेकडे रीतसर अर्ज करावा लागतो. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर निर्धारित शुल्क भरून फ्लेक्स लावण्याची परवानगी दिली जाते. तरीदेखील अनेकांनी दसऱ्याचा मुहूर्त साधत शहर व परिसरात परवानगी न घेता मोठमोठे फ्लेक्स उभे केले. ही बाब निदर्शनास येताच मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने दोन दिवसांपासून असे फ्लेक्स जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पथकाने बुधवारी दिवसभरात पोवई नाका, राजपथ, मोती चौक तसेच राजवाडा परिसरातील एकूण २५ फ्लेक्स जप्त केले.
संबंधित फ्लेक्सधारकांना नोटिसा बजावल्या जाणार असून, त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजार रुपये सेवा शुल्क वसूल केले जाणार आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर होताच पालिकेने आचार संहितेची अंमलबजावणी सुरू केली असून, या कारवाईमुळे शहर फ्लेक्समुक्त होऊ लागले आहे.