सातारा प्रतिनिधी । सातारा – जावली विधानसभा मतदारसंघातील तब्बल 26 ग्रामपंचायतींना आता नवीन इमारती मिळणार आहेत. कारण या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रयत्न केले आहेत.
राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून मंजूर निधीतून सातारा तालुक्यातील 13 आणि जावली तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींना नवीन स्वतंत्र कार्यालय इमारत बांधल्या जाणार आहेत. नवीन इमारतींमुळे या 26 ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुरळीतपणा येण्यास मदत होणार आहे.
सातारा तालुक्यातील वेणेखोल, बेंडवाडी, मोरेवाडी, निगुडमाळ, पिलाणी, मस्करवाडी, वावदरे, राकुसलेवाडी, आरगडवाडी, बोपोशी, चाळकेवाडी, साबळेवाडी आणि पेट्री-अनावळे या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी 20 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जावली तालुक्यातील कुंभारगणी, शिंदेवाडी, अंधारी कास, मरडमुरे, पानस, म्हाते बु।, केसकरवाडी, काटवली, वरशी, रानगेघर, बामणोली, कसबे, मोहाट आणि नांदगणे या ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यालय इमारत बांधकामासाठी प्रत्येकी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर इमारतींचे बांधकाम त्वरित सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.