सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन तसेच घनकचरा नियोजनाबाबत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. कारण या सर्व गोष्टी स्वच्छ आणि सुंदर तसेच आरोग्यपूर्ण गावासाठी महत्वाच्या मानल्या जातात. या मुख्य हेतूतून सातारा जिल्ह्यात सात तालुक्यांतील २१ ग्रामपंचायतींना ५ कोटी ५६ लाख रुपयांचा कार्यारंभ आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्यावतीने नुकताच देण्यात आला आहे. यातील सर्वाधिक ९ गावे ही कराड तालुक्यातील आहेत.
सातारा जिल्ह्यातील खेडेगावात घनकचरा आणि सांडपाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत शासनस्तरावरुन विविध उपाययोजना देखील केल्या जात आहेत. त्यामुळे गावागावांत जनजागृती करीत सातारा जिल्ह्यात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन खूप चांगल्या पध्दतीने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यासाठी प्रयत्नही करण्यात येतात. आता सात तालुक्यातील २१ गावांना व्यवस्थापनासाठी साडे पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील लोकसंख्या आणि विस्ताराने मोठ्या आसलेल्या कराड तालुक्यातील काळगाव, उंडाळे, दुशेरे, रेठरे खुर्द, वहागाव, कोडोली, रेठरे बुद्रुक, विरवडे, इंदोली या गावांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. तसेच फलटण तालुक्यातील विडणी, खटाव तालुक्यातील मायणी, निमसोड व सिद्धेश्वर कुरोली तर माण तालुक्यातील पळशी, गोंदवगों ले बुद्रुक. सातारा तालुक्यातील अतित, खोजेवाडी, जकातवाडी, त्याचबरोबर पाटण तालुक्यातील ढोरोशी, विहे आणि जावळी तालुक्यातील कुडाळ या ग्रामपंचायतींना तीं कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
या निधीतून गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे केली जाणार आहेत. घनकचऱ्यासाठी नॅडेफ व गांडुळ खत प्रकल्पाद्वारे खत निर्मितीही केली जाणार आहे. तर सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे, लिच पिट, रिड बेड, रुट झोन प्रक्रिया केली जाणार आहे. तर स्वच्छ सुंदर व आरोग्यपूर्ण गावांसाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन गरजेचे आहे. आता ग्रामपंचायतींना तीं ही कामे दर्जेदार होण्यासाठी लक्ष ठेवावे लागणार आहे. ओला व सुका कचरा कुटुंबपातळीवरच वर्गीकरण करावे लागेल. त्यातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात होईल. सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांमुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.