सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत १६२ कामांचा समावेश असलेला ४८२ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला आहे. भारतीय सर्वेक्षण खात्याने केलेल्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणांनी दरड व भूस्खलन प्रतिबंधात्मक उपाययोजना, पूरप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंती आदि कामांचा आराखडा तयार केला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ व अतिपर्जन्याचा असून त्याचा भूकंपप्रवण क्षेत्रात समावेश आहे. जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे महाबळेश्वर, वाई, जावली व पाटण तालुक्यातील ५ गावांमध्ये भूस्खलन होऊन जिवित व वित्तहानी झाली होती. त्यानुषंगाने जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, पुणे (जीएसआप) या संस्थेच्यावतीने भूस्खलन व दरडप्रवण भागाचा सर्वे करण्यात आला.
त्या भागात उपाययोजना करण्यासंदर्भात या संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर केला. त्यानुषंगाने दरडप्रवण व भूस्खलन प्रवण क्षेत्रात पूर संरक्षण भिंत बांधकाम, दरड संरक्षण भिंत, एलटी व एचटी लाईन भूमिगत वाहिनी करणे, ट्रेनेजचे बांधकाम करणे, पोचमार्ग सुधारणा करणे, लहन पूल, गटारे व अंतर्गत रस्ता बांधकाम, नारला रुंदीकरण व खोलीकरण तसेच बंधारे दुरुस्ती करणे इत्यादी आपती सौम्यीकरण अंतर्गत उपाययोजना मुचवण्यात आल्या
जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरणांतर्गत १८२ प्रस्तावांच्या संरचनात्मक कामांना व २ असंरचानात्मक कामांना प्रशासकीय मंजुरी व आवश्यक ४१० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र २० प्रस्ताव निकषात बसत नसल्यामुळे ते अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर सुधारित आराखडा तयार करण्यात आला. संरक्षण भिंत बांधणे भेगा बुजवणे, डोंगरावरील धोकादायक दरडी व दगड हटवणे, नदी किंवा ओढ्यांच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत करणे अशी कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्राधान्याने कामाचे प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आले आहेत. आपत्ती निवारण आराखडा ४८२ कोटींचा असून त्यामध्ये प्राधान्याने कामे सुचवण्यात आली आहेत.
सातारा, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील दरडप्रवण भागात संरक्षक भिंत बांधणे, नाला सरळीकरण, खोलीकरण करणे, भेगा मुजवणे, धोकादायक दरडी/दगड हटवणे, पाण्याचा प्रवाह सुरळीत करणे ही ४६ कामे असून त्यासाठी ११८ कोटी ५९ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. जावली व पाटण तालुक्यातील दरडप्रवण भागात संरक्षक भिंत बांधणे, नाला सरळीकरण व खोलीकरण करणे, भेगा बुजवणे, धोकायदायक दरडी व दगड हटवणे, पाण्याचा प्रवाह सुरळीत करणे ही ४९ कामे असून त्यासाठी २४ कोटी ९६ लाख खर्च अंदाजित आहे. सातारा शहरालगत संभाव्य दरड प्रवण भागात संरक्षक भिंत बांधणे, नाला सरळीकरण व खोलीकरण करणे या कामासाठी ३८ कोटी ९१ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.
सातारा पूर प्रवण भागात पूरसंरक्षक भिंतीच्या ६ कामांसाठी २९ कोटी ४६ लाख, वाई पूर प्रवणभागात पूरसंरक्षक भिंत ६ कामांसाठी १३ कोटी ७६ लाख, महाबळेश्वर पूर प्रवण भागात ३ पूर संरक्षक भिंतीसाठी ६ कोटी २५ लाख, फलटण व कोरेगाव तालुक्यातील ओढ्यालगत संरक्षक भिंतीच्या १६ कामांसाठी ४ कोटी तसेच माण, खटाव, फलटण व खंडाळा तालुक्यातील दुष्काळसदृश्य तालुक्यातील पाझर तलावांच्या १५ कामांसाठी ३ कोटी ६३ लाख खर्च अपेक्षित आहे. या आराखड्यात १६२ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.