कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास दि. २७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ४३ नामनिर्देशन पत्र अर्ज विक्री झाली असून दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना मर्यादित, यशवंतनगर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक २०२५ ची धामधूम सुरू झाली आहे. २१ संचालकांच्या जागेसाठी ही निवडणूक होत असून सह्याद्री कारखान्याचे ३२ हजार २०५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास गुरुवार पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये पहिल्या दिवशी ११ नामनिर्देशन पत्र अर्ज विक्री झाली तर मसूर गटातून संतोष सिदोजीराव घार्गे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.
शुक्रवारी एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही मात्र ४३ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख बुधवार ५ मार्च आहे. एका बाजूला नामनिर्देशन पत्र भरणे व खरेदी करणेसाठी इच्छुक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते येत आहेत तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी व विरोधकांकडून कोपरा बैठका, सभा, वैयक्तिक गाठीभेटीचा सिलसिला मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.