पंधराव्या वित्त आयोगातून सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 41 कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून 41 कोटी रुपयांचा निधी मिळाला. या निधीमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना वेग येणार असून पेयजल पाणीपुरवठा, वॉटर सायकलिंग यासह विविध योजनांची रखडलेली कामे यामुळे मार्गी लागणार आहेत.

ग्रामीण विकासासाठी 14 आणि 15 व्या वित्त आयोगाचा निधी महत्वपूर्ण ठरला आहे. या निधीतून गावोगावी विकासाची गंगा सुरु झाली आहे. गावांचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतींना थेट वित्त आयोगाचा निधी मिळत असल्याने रखडलेली कामे आता मार्गी लागत आहे. जिल्ह्यातील एक हजार 492 ग्रामपंचायतींच्या खात्यावर 41 कोटी 30 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. मागील काही दिवसात निधी नसल्याने अनेक कामे ठप्प होती. मात्र, आता या निधीमुळे विकासकामांना गती मिळणार आहे.

जावळी तालुक्‍यातील 103 ग्रामपंचायतींना 1 कोटी 57 लाख 67 हजार, वाई तालुक्‍यातील 89 ग्रामपंचायतींना 2 कोटी 76 लाख, सातारा तालुक्‍यातील 187 ग्रामपंचायतींना 5 कोटी 42 लाख, फलटण तालुक्‍यातील 127 ग्रामपंचायतींना 5 कोटी 13 लाख, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील 63 ग्रामपंचायतींना 66 लाख 60 हजार, माण तालुक्‍यातील 92 ग्रामपंचायतींना 3 कोटी 19 लाख 78 हजार, कोरेगाव तालुक्‍यातील 136 ग्रामपंचायतींना 3 कोटी 74 लाख 53 हजार, खटाव तालुक्‍यातील 127 ग्रामपंचायतींना 4 कोटी 40 लाख, खंडाळा तालुक्‍यातील 63 ग्रामपंचायतींना 1 कोटी 98 लाख 88 हजार, कराड तालुक्‍यातील 187 ग्रामपंचायतींना 7 कोटी 90 लाख 78 हजार, पाटण तालुक्‍यातील 211 ग्रामपंचायतींना 4 कोटी 51 लाख 19 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामीण भागाचा विकास होत आहे. जिल्ह्यात एक हजार 492 ग्रामपंचायतींपैकी 107 ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक कार्यरत आहेत. प्रशासक असणाऱ्या ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगाचा 2023-24 च्या बंधित निधी देण्यात आला नाही.