कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील वारुंजी येथे घरानजीक खेळताना पाय घसरून विहिरीत पडल्याने चार वर्षांच्या बालिकेचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी बाराच्या सुमारास घटना घडली. ओवी विश्वास जाधव (वय 4, मूळ रा. तासवडे, सध्या रा. वारुंजी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
कराड तालुक्यातील तासवडे येथील ओवी जाधव चिमुरडी सध्या वारुंजी येथे राहण्यास होती. सोमवारी दुपारी ती घरानजीक खेळत असताना घराजवळ असलेल्या विहिरीत पाय घसरून पडली. ही बाब निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेऊन ओवी हिला विहिरीतून बाहेर काढले.
ओवीला उपचारार्थ कराड येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वारूंजी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.