सातारा परिवहन विभागात 4 स्पीडगन इंटरसेप्टर वाहने दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने सातारा जिह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात 4 स्पीडगन इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहेत. ही वाहने महामार्ग, राज्यमार्ग व अन्य ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.

राज्याच्या परिवहन विभागाकडून सातारा जिह्याला 4 नवीन स्पीडगन इंटरसेप्टर वाहने मिळाली असून, या वाहनांत अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. वेगमर्यादा निश्चित करून देण्यात आलेल्या रस्त्यावर वेगमर्यादा ओलांडून जाणारे वाहन सहजपणे टिपता येणार आहे.

गाडीच्या काचांना बसवण्यात आलेली काळ्या रंगाची फिल्म किती जाडीची आहे, याचीही तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर चालक मद्यपान करून तर वाहन चालवत नाही ना, याची तपासणी करण्यासाठी ब्रेथ अनालायझर मशीन याच वाहनात बसवण्यात आली आहे. त्यामुळे वायुवेग पथकासह भरारी पथकांना तपासणी करण्यास येणारी अडचण दूर होणार आहे.

महामार्गासह राज्यमार्ग व जिल्हामार्गावरील वेगवान वाहनांना रोखण्यासाठी आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी इंटरसेप्टर वाहने तैनात करण्यात येणार आहेत. एकाचवेळी अनेक वाहनांच्या नोंदी होणार आहेत. हायटेक स्पीड गनचा वापर करून जास्तीत जास्त वाहने एकाच कॅमेऱयात टिपून त्यांच्या वेगाच्या नोंदी ठेवतील. निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवणाऱ्या ई-चलन जारी केले जाईल आणि दंड ऑनलाइन भरण्यासाठी मोबाईल फोनवर संदेश मिळणार आहेत.