कराड प्रतिनिधी | शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या शाळकरी मुलांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने यात चार मुले जखमी झाल्याची घटना आरेवाडी, ता. कराड येथे नुकतीच घडली. चार मुलांना चावा घेतल्यानंतर याच कुत्र्याने साजूरमधील आणखी एकाला चावा घेतला असून सर्व जखमींवर कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरेवाडी जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मुले बुधवारी शाळा सुटल्यानंतर घरी निघाली होती. समोरून आलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करत चावा घेतला. उत्तर तांबवे येथील हायस्कूलमधून घरी येत असलेल्या एका मुलीला देखील कुत्र्याने चावा घेतला आहे. हा कुत्रा पिसाळलेला असल्याचे लक्षात येतात सर्वजण सावध झाले.
पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात साक्षी राजेंद्र देसाई (इयत्ता नववी), ऋषभ गणेश देसाई (इयत्ता पहिली), श्रेयस संभाजी तिकुडवे (इयत्ता तिसरी), मल्हार गजेंद्र कुंभार (इयत्ता दुसरी, सर्व रा. आरेवाडी, ता. कराड) आणि साजूरमधील एक मुलगा, असे पाच जण जखमी झाले आहेत.
मुख्याध्यापक अन् शिक्षकांची तत्परता
मिसळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंकुश नांगरे, शिक्षक विकास देसाई, जे. वाय. कदम यांनी तातडीने कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. रात्री उशीरापर्यंत रूग्णालयात थांबून विद्यार्थ्यांची काळजी घेतली.