सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह 3 जणांवर वन विभागाकडुन गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडेसहा किलो असून त्याची किंमत 6 कोटी रुपये इतकी आहे.
महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील, संतोष खुशालचंद्र जैन (रा. निसर्ग विहार रत्नागिरी), संजय जयराम सुर्वे (रा. मेढा ता. जावळी), अनिल अर्जुन ओंबळे (रा. बोंडारवाडी ता. जावळी, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर येथे व्हेलं माशाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर महांगडे यांनी सोमवारी रात्री 1 वाजता व्हेल माशाचे तसकरीचा मुद्देमाल मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात अधिक तपास केल्यानंतर या प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवक प्रकाश रामचंद्र पाटील याच्यासह एकूण चार जण अटक करण्यात आली आहे. त्यांना आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.