सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सर्वत्र ऊस तोडणीचा हंगाम सुरु आहे. जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील रावसाहेब बेलदार या शेतकऱ्यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना कोल्हा या वन्य प्राण्यांची साधारण ७ ते ८ दिवसांची नवजात चार पिल्ले आढळून आली. ऊसाच्या फडात आढळून आलेली पिल्ले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे ठेऊन नंतर त्या पिल्लांची त्यांच्या आईशी भेट घडवून दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील सांगवी येथील राहणाऱ्या रावसाहेब बेलदार या शेतकऱ्यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना कोल्हा या वन्य प्राण्यांची साधारण ७ ते ८ दिवसांची नवजात चार पिल्ले आढळून आली. यानंतर बेलदार यांनी ऊसाच्या फडात आढळून आलेलया पिल्लांबाबतची माहिती ग्लोबल अर्थ फाउंडेशनचे प्राणीमित्र सचिन जाधव यांना दिली. त्यानंतर सातारा वन विभागाच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षक दिगंबर जाधव, फलटण तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेंद्र आवारे, वनरक्षक राहुल निकम, ग्लोबल अर्थ फाउंडेशनच्या टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सायंकाळी सहाच्या सुमारास या टीमने ज्या ठिकाणी पिल्ले सापडली, त्या जागीच ती एका लहानशा प्लॅस्टिक बॉक्समध्ये ठेवली. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावले. यानंतर सुमारे अर्ध्या तासाने येऊन त्या पिल्लांची आई त्यांना पुन्हा घेऊन गेली. अखेर कोल्हा अन् तिच्या पिल्लांची भेट घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले. यासाठी पुण्याच्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य श्रेयश कांबळे, अभिलाष बनसोडे यांची टीमने मदत घेतली.