सातारा जिल्ह्यात आचारसंहितेचा भंग; सी-व्हिजिल ॲपवर ‘इतक्या’ तक्रारी दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराने वेग घेतला असून आता फक्त आठ ते नऊ दिवस प्रचारस्ताही बाकी राहिलेले आहेत. त्यासोबतच आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या तक्रारीही शासनाच्या सी व्हिजील ॲपवर मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागल्या आहेत. आतापर्यंत १४ तक्रारी दाखल झाल्या असून, यामध्ये कोरेगाव मतदारसंघात सर्वाधिक सहा तक्रारी आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेत अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत. याबाबतची माहिती शासनाच्या सी व्हिजील ॲपवरून सर्वसामान्य नागरिक निवडणूक विभागाला पाठवत आहेत. त्यामुळे आचारसंहिता भंगाच्या प्रकाराला आळा घालण्यात निवडणूक प्रशासनाला यश येत आहे. त्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे.

निवडणूक आयोगाच्या सी व्हिजील ॲपवर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून आचारसंहिता भंगाच्या १४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सर्व तक्रारी सर्वसामान्य नागरिक व राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही केलेल्या आहेत. यावर निवडणूक विभागाने तातडीने कार्यवाही केलेली आहे. ॲपवर दाखल तक्रारीत पक्षाचे चिन्ह गाडीवर लावणे, परवानगीविना विकास काम सुरू करणे, विकास कामासंदर्भातील फलक न झाकणे मतदारसंघात मतदारांना वस्तूंचे वाटप करणे, विविध ठिकाणचे राजकीय नेत्यांच्या नावाचे फलक न झाकणे, रस्त्याचे काम सुरू करणे आदी बाबींचा समावेश आहे.

याबाबत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक सहा तक्रारी आहेत. यामध्ये कोरेगावच्या आमदारांचा फोटो, नाव व पक्षाचे चिन्ह असलेल्या डिशेस वाटप करण्यात येत असल्याबाबत आहे. त्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता कोणत्या ठिकाणी हे वाटप सुरू आहे, याची माहिती संबंधिताने दिलेली नसल्याने त्यांना २४ तासांत याबाबतचा व्हिडिओ तसेच स्थळ द्यावे, अशी सूचना निवडणूक विभागाने केली आहे.

तक्रारींची अशी आहे स्थिती…

सी व्हिजील ॲपवरून विविध मतदारसंघांतून दाखल झालेल्या तक्रारी अशा आहेत. फलटण विधानसभा मतदार संघ -१, कोरेगाव विधानसभा मतदार संघ – ६, वाई विधानसभा मतदार संघ – २, कराड विधानसभा मतदार संघ – १, माण विधानसभा मतदार संघ – २, सातारा विधानसभा मतदार संघ २.

सी-व्हिजिल ॲपची निर्मिती

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सी- व्हिजिल ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांना आपल्या परिसरातील आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या ॲपच्या माध्यमातून प्रामुख्याने ऑनलाइन पद्धतीने तक्रार देता येणार आहे.

आचारसंहितेत ‘या’ बाबींवर मर्यादा…

१) निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही.

२) याशिवाय निवडणूक प्रचारात सरकारी वाहने, बंगले, विमान किंवा सरकारी सुविधांचा वापर करता येत नाही.

३) आचारसंहिता लागू झाल्यानंतर

४) कोणतीही सरकारी घोषणा, पायाभरणी किंवा उ‌द्घाटन होत नाही.

५) याशिवाय, कोणतीही रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक रॅलीमध्ये पैसा, धर्म, जात यांच्या नावावर मते मागणे पूर्णपणे निषिद्ध आहे.