सातारा प्रतिनिधी । गुंतवणूकीवर जादा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून एकाला 4 लाख 85 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी आरोपीवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशा नायर (रा. हिरानंदानी पवई, मुंबई) व रजत वरबा अशी आरोपींची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अवधूत गंगाधर पुरी (रा. राजधानी कॉलनी, सातारा परिसर) यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, 29 मार्च 2024 ते आजपर्यंत आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या फेसबुक अकाउंटवर लिंक पाठवली. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादीकडून वेळोवेळी असे तब्बल चार लाख 85 हजार रुपये घेतले.
मात्र, गुंतवणूक केलेले पैसे आणि त्याच्या जादा परताव्याची जेव्हा अवधूत पुरी यांनी मागणी केली. त्यानंतर आरोपी निशा नायर, रजत वरबा हे पुरी यांना टाळू लागले. कालांतराने त्यांनी त्यांचा संपर्कही बंद केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अवधूत पुरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सातारा पोलीस करीत आहेत.