सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्यावतीने सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळे विकासाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. 381 कोटी 56 लाख रुपयांच्या आराखड्या संबंधाचा शासन निर्णय मंगळवारी (5 मार्च) जारी करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या. आणि या सुधारीत पर्यटन आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता मिळवली त्यानंतर शासन निर्णय जारी झाला. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक, निसर्ग, जल पर्यटनस्थळांचा विकास होणार असून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या पर्यटनवाढीस वेग येणार आहे.
मुंबई आणि पुण्यात घेतल्या बैठका
सातारा जिल्ह्यातील निसर्गाचे संवर्धन व्हावे, ऐतिहासिक, धार्मिक, जल पर्यटनस्थळांचा, निसर्गपुरक विकास व्हावा, जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढावी या हेतूने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने मुंबईत आणि पुण्यात संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले होते तसेच सुधारीत पर्यटन विकास आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले होते.
सुधारित पर्यटन आराखड्यास मान्यता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8 फेब्रुवारी मुंबईत आणि तदनंतर पुण्यात यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यानंतर वेगाने कार्यवाही होऊन 22 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत सुधारित पर्यटन आराखड्यास मान्यता घेण्यात आली. शिखर समितीच्या मान्यतेनंतर त्यासंदर्भातील शासन निर्णय नियोजन विभागाकडून मंगळवारी जारी करण्यात आला.