अर्थमंत्री अजितदादांच्या बजेटमध्ये सातारच्या पर्यटनासाठी 381 कोटी, कराडला युवक कौशल्य प्रकल्प तरतूद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल शुक्रवारी दुपारी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि ४३० खाटांचे रुग्णालय, कराड येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये युवक कौशल्य प्रकल्प, पश्चिम घाटाच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी रुपयांचा एकात्मिक विकास आराखडा असे महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.

काल शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याने याकडे सातारा जिल्ह्यासाठी कोणती तरतूद करण्यात येते?, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. यानुसार राज्यात सध्या या १ लाख लोकसंख्येमागे ८४ डॉक्टर आहेत.

२०३५ पर्यंत ही संख्या १०० च्या वर नेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी १०० प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यात ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात साताराचाही समावेश करण्यात आला आहे.

३८१.५६ कोटी रुपये एकात्मिक विकास आराखडा तयार

सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ३८१.५६ कोटी रुपये एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत श्रीक्षेत्र महाबळेश्वर विकास, प्रतापगड किल्ला जतन व सवंर्धन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन, कोयना व हेळवाक वनक्षेत्र अंतर्गत जलपर्यटनाचा समावेश आहे.

उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार

ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पानंतर ५०० औद्योगिक संस्थांची दर्जा वाढ, मॉडेल, आयटीआय, जागतिक कौशल्यकेंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे नागपूरसह सातारा जिल्ह्यातील कराड येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स मान्यता देण्यात आली.